
बापाच्या हातातून पडून चिमुकली बेशद्ध
रत्नागिरी ः कुवारबाव-आदर्शनगर येथे सात महिन्याच्या मुलीच्या जबरदस्तीने घेऊन ती खाली पडून जखमी झाली. तसेच पत्नीलाही मारहाण केली. या प्रकरणी पतीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रवींद्र मुळ्ये (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) रात्री सव्वा आठच्या सुमारास अविराज निवास, आदर्शनगर, कुवारबाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. आरोही सौरभ मुळ्ये या माहेरी आदर्शनगर मिरजोळे येथे माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्याची मुलगी आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजता मुलगी झोपलेली असताना संशयित सौरभ तेथे आला त्यावेळी पत्नी आरोही हिने ती झोपलेली आहे तिला झोपू दे असे सांगितले. याचा राग मनात धरुन रात्री आठ वाजता सौरभ पुन्हा तेथे आला व पत्नीकडे मुलीला मागू लागला. त्यावेळी तिला भरवते मग तुमच्याकडे देते असे सांगितले. पण सौरभ याने न ऐकता मुलीची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर उचलून घेतले आणि ती खाली पडली. यामध्ये त्या चिमुकलीच्या डोक्याला लागून ती बेशुद्ध झाली. तसेच पत्नीला मारहाण केली. या प्रकरणी आरोही हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पती सौरभ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.