
चारवर्षे रखडलेली संगमेश्वरची आमसभा १७ आँगस्टला
संगमेश्वर: वादळ व महापूर या नैसर्गिक आपत्तीसह कोरोनासंकट यामुळे गत चार वर्षांत न झालेली संगमेश्वर तालुक्याची आमसभा दि. १७ रोजी संपन्न होणार आहे.
चिपळूण – संगमेश्वरचे आम. शेखर निकम यांच्या कारकीर्दीतील आमसभा होणार की नाही याबाबत तालुकावासियांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या या आमसभेला अखेर मुहूर्त सापडला असून ही आमसभा दी. १७ आँगष्ट ला चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली देवरूख येथिल माटे-भोजने सभागृहात सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.
आमदार शेखर निकम यांच्या कारकीर्दीतील ही पहिलीच आमसभा संपन्न होत असून ते कशाप्रकारे तालुकावासियांच्या समस्यांवर तोडगा काढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमसभेत जनतेने उपस्थित केलेले अनेक प्रश्न मार्गी लागतात. तर काही प्रश्न मार्गी लागण्यास चालना मिळते अशी सामान्यांची भाबडी आशा असते. त्यामुळे तालुक्यातील जनता या आमसभेची आतूरतेने वाटही पाहत असते.
विविध कारणांमुळे आमसभा होवू शकली नव्हती. या संगमेश्वर तालुक्यातील आमसभेत लांजा-राजापूर मतदार संघातील दाभोळे विभाग. चिपळूण- संगमेश्वर मतदार संघ. रत्नागिरी मतदारसंघातील खाडीपट्टा भागांचा समावेश असल्यामुळे या तालुक्यातील आमसभेला पालकमंत्री उदय सामंत,आम. राजन साळवी व आम. शेखर निकम असे तीन आमदार लाभले आहेत.
गत चार वर्षात आमसभा न झाल्याने जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत तसेच विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्तेही (आपल्या राजकीय लाभासाठी) समस्या मांडण्यासाठी सज्ज झाले असल्याने ही सभा वाजते की गाजते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दि. १७ला होत असलेल्या आमसभेत ज्या नागरिकांना आपल्या समस्या आहेत. त्या बद्दलची लेखी निवेदने दी. १६ पर्यंत पंचायत समितीत सादर करावीत, असे आवाहन गटविकास अधिकारी. भरत चौगले यांनी केले आहे..