
देवरुख बसस्थानकात महिलेची पर्स लांबवली
देवरूख : एसटी बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स चोरट्याने लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ही पर्स संबंधित महिलेला मिळाली. चोरी करणारी महिला असून या महिलेला देवरूख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.देवरूख बसस्थानकातून दुपारी ३ वाजता देवरूख-कुंडी बस फेरी सुटते. शुक्रवारी कुंडी येथील भूमी धावडे या बसफेरीमध्ये चढत असताना चोरट्याने धावडे यांची पर्स लांबवली. हा प्रकार धावडे यांनी प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिला. कुंडी गावचे पोलीस पाटील धीरेंद्र मांजरेकर, प्रकाश धावडे यांच्या पुढाकाराने संशयित महिलेचा शोध घेण्यात आला. संशयित महिलेला परिसरात पकडण्यात यशही आले. पर्समधील पैसे घेवून ही पर्स संशयित महिलेने फेकून दिली. चोरी करणारी महिला ही काटवली गावातील आहे. तिच्याकडे पर्समधील रोख रक्कम आढळली. या घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे वैभव कांबळे व अमोल मांगले यांनी देवरूख बससथानकात धाव घेतेली. प्रवाशांची कैफियत जाणून घेतली. चोरी करणाऱ्या महिलेला देवरूख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपास देवरूख पोलीस करीत आहेत.