
पोटच्या अल्पवयीन लेकीवरच अत्याचार, बापास २० वर्षे सक्तमजुरी
खेड:- पोटच्या अल्पवयीन लेकीवरच वारंवार अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील नराधम बापास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी बुधवारी, २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचाही समावेश आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले. ही घटना ऑक्टोबर २०२० मध्ये घडली होती.
खेड तालुक्यातील एका गावात वास्तव्यात असलेल्या नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर सतत अत्याचार केला. ही बाब तिने आईच्या कानावर घातल्यानंतर आईने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने नराधम बापास बेड्या ठोकल्या होत्या. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष व कागदोपत्री तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. त्याला २५,००० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षाही सुनावली.