
दापोलीच्या सड्यावर प्रथमच बहरली ‘कोकणची राणी’
दापोली: कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी ‘एकदांडी’ म्हणजेच ‘दिपकाडी कोंकणेन्स’ ही प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते. या रोपण यशस्वी झाले असून या ‘संकटग्रस्त’ प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे.
‘दिपकाडी कोंकणेन्स’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. ‘एकदांडी’, ‘गौरीची फुलं’ किंवा ‘ढोकाची फुलं’ अशा स्थानिक नावांनी ही प्रजात ओळखळी जाते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचा बहर अंदाजे ३० ठिकाणांवर नोंदवण्यात आला आहे. या प्रजातीच्या अधिवासाचा विस्तार हा उत्तरेकडे देवरुखपासून दक्षिणेकडे गोव्यातील मोपाच्या सड्यापर्यंत आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, राजापूर, देवगड ते वेंगुर्ला तालुक्यापर्यंत पसरलेल्या किनाऱी सड्यांवर ही वनस्पती फुलते. त्यामुळे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांपुरता प्रदेशनिष्ठ आहे. या प्रदेशनिष्ठतेमुळेच ‘आययूसीएन’च्या लाल यादीत या प्रजातीला ‘संकटग्रस्त’ प्रजातींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. अशी ही ‘संकटग्रस्त’ प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरलेली पाहायला मिळत आहे. ‘आययूसीएन’साठी या वनस्पतीचे मूल्यांकन करणारे वनस्पतिशास्त्रज्ञ डाॅ. अमित मिरगळ यांनी या प्रजातीचे रोपण दापोली तालुक्यात केले होते.
डाॅ. मिरगळ हे २०१२ पासून ‘एकदांडी’चे सखोल संशोधन करत आहेत. या प्रजातीचे मर्यादित अधिवास क्षेत्राचा अंदाज घेऊन मिरगळ यांनी २०१३ साली ‘एकदांडी’च्या काही बिया दापोली तालुक्यातील दहा ते बारा सड्यांवर रोपणासाठी टाकल्या. यातील अडखळ आणि महामाईनगर येथील सड्यांवरील बिया दशकभरानंतर अंकुरित झाल्या आहेत. अडखळ येथे ५ झाडांना फुले आणि १८ नवीन रोपं आढळली असून महामाईनगर येथे १८ झाडांना फुले व फळ आणि १० नवीन रोपं आढळून आली असल्याची माहिती मिरगळ यांनी बोलताना दिली.