
बेकायदा गर्भपात केंद्र चालवल्या प्रकरणी डॉ. शिगवण यांच्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी : गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रूग्णांना देणाऱ्या शहरातील टीआरपी येथील साई हॉस्पीटलचे प्रमुख डॉ.अनंत नारायण शिगवण (वय 67) यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात वैद्यकीय गर्भपात कायदा सन 1971 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी डॉ.शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गर्भनिदान व गर्भपात न करणारा प्रदेश म्हणून कोकणची ओळख होती. डॉ.शिगवण यांच्या या कृत्यामुळे कोकणला गालबोट लागले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांच्या खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे एमआयडीसीमधील टीआरपी येथे डॉ. अनंत शिगवण यांच्या साई हॉस्पीटलमध्ये बेकायदा गर्भपात होत असल्याचे निष्पन्न झाले होते.
शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस पथकाला सोबत घेऊन आपल्या वैद्यकीय पथकासमवेत साई हॉस्पीटलवर छापा टाकला. यावेळी साई हॉस्पीटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य असल्याचे आढळून आले. वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्या, साहित्य जप्त केल्या.
डॉ.भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.अनंत नारायण शिगवण यांच्याविरूद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा सन 1971 व सन 2023 मध्ये नमूद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव नसताना तसेच साई हॉस्पीटलला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना त्यांनी त्यांच्या मालकीच्या साई हॉस्पीटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे रूग्णांना देत असल्याने त्यांनी वैद्यकीय गर्भपात कायदा सन 1971 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा केल्याने त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गर्भपात कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. कोकणात गर्भपात होत नाहीत अशी ओळख असतानाच डॉ.अनंत शिगवण हे बेकायदा गर्भपात करीत असल्याचे उघड झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने करीत आहेत.