
घरामध्ये पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथे राहत्या घरामध्ये पाय घसरुन पडलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महमद मिरासाब शेख (६०, रा. धनजीनाका, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. मागील दीड महिन्यापासून महमद यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते. या ठिकाणी उपचार सुरु असताना महमद यांचा मृत्यू झाला.
रत्नागिरी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद शेख हे आपल्या धनजीनाका येथील आपल्या घरामध्ये पाय घसरुन पडले होते. या घटनेत महमद यांना गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी त्यांना ३ जून २०२४ रोजी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना महमद यांचा १३ जुलै रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.