
चिपळूणात बेकायदा पार्किंग, तिघांवर कारवाई
चिपळूण:- शहरातील विरेश्वर परिसरात मुख्य रस्त्यावरच बेकायदा पार्किंग करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक तक्रारी करीत असतानाही दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी ही कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर विरेश्वर परिसर आहे. या परिसरातून दसपटी, सावर्डे, रत्नागिरी, पुणे, मुंबई आदी भागातील अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. यासाठी अनेक लहान-मोठी वाहने मुख्य रस्त्यांसह अतंर्गत रस्त्यांवर पार्किंग करून ठेवलेली दिसतात. यामुळे अन्य वाहतूकीला कायमच त्रास होतो. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे वाहनांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होते. तरीही पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
असे असतानाच बुधवारी येथे दोन मिनिबस व टेम्पो ट्रव्हलर पार्किंग केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सुरेंद्र शेलार, प्रवीण वाजे, रोशन शिंदे या तिघांवर कारवाई केली आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर या परिसरात तितकीशी वाहने दिसून आली नाहीत. मात्र दोन दिवसानंतर पुन्हा हा परिसर वाहनांनी गजबजणार असून वाहतूककोंडीचा त्रास होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मागणीही होत आहे.