जिल्ह्यातील ७० हजार ५५० बालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी
रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील 70 हजार 550 पाच वर्षाखालील बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 626 बालकांना अतिसार झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.
गत महिन्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. ‘अतिसारावर करूया मात, 14 दिवस झिंक, दिवसातून एकदा’, ओआरएस, झिंकची घेऊ साथ’ अशी टॅगलाईन याला देण्यात आली होती. अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली
अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचार पद्धती असून अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्या जात
आहेत.
अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पूर्ववत होणे, सुस्तावलेला किंवा बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.
जिल्ह्यात अतिसार पंधरवड्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 70 हजार 550 बालकांची तपासाणी करण्यात आली. त्यापैकी 626 बालकांना अतिसार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करण्यात आले.