
थेट हॉटेलमध्ये घुसला टँकर, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये टँकर घुसला. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीलाल बेजारिया (40, रा. उदयपूर-राजस्थान) असे टँकर चालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 12.15 च्या सुमारास घडली होती.
चालक लक्ष्मीलाल बेजारिया हा टँकर (जी.जे.16/ए.एन.3387) घेऊन गोवा येथून राजस्थानच्या दिशेने जात होता. पोलादपूर हद्दीत आला असता स्पीडब्रेकरवर आदळल्याने अचानक ताबा सुटून टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला. अपघाताचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहा. पोलीस उपनिरीक्षक जागडे, पोलीस हवालदार स्वप्निल कदम, वाहतूक पोलीस धायगुडे, कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक पी. एस. धडे व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. चालकाच्या शरीरात घुसलेला पाईप बाहेर काढून तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कामगारांसह ग्राहक भयभीत होऊन सैरावैरा पळाले. थेट हॉटेल मध्ये घुसलेल्या टँकर चालकाने ब्रेक दाबून तेथेच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. यात हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती.