
वेरळमधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळला
खेड:- तालुक्यातील वेरळ येथून गुरुवारी बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह भोस्ते जगबुडी पुलानजीक नदीपात्रात शुक्रवारी दुपारी आढळून आला. तुषार मनोहर त्रिपाठी असे त्या मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.
११ जुलैपासून तुषार हा बेपत्ता होता. त्याचा अन्यत्र शोधदेखील घेण्यात आला; मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने याबाबत येथील पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. खेडेकर व सहकारी यांनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद आहे.