५० हजारांची लाच घेताना निबंधक कार्यालयातील लिपिकाला पकडले
रत्नागिरी :- सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.११) गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही कारवाई केली. विनायक रामचंद्र भोवड, (वय ५७, रा. ‘स्वामी’ त्रिविक्रमनगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी विनायक भोवड याने २६ जून २०२४ रोजी तक्रारदार यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर ही लाचेची रक्कम निबंधक कार्यालयात स्वीकारताना त्याला पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, सहायक फौजदार संदीप ओगले, संतोष कोळेकर, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.