शेअर मार्केट मध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक
रत्नागिरी:- शेअर मार्केट मधील एका प्रसिद्ध कंपनीच्या नावाने गुंतवणूक व त्यावर नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट या कंपनीचे सल्लागार सांची अरोरा (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २९ फेब्रुवारी ते १३ मे २०२४ या कालवधीत मारुती मंदिर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभय कृष्णनाथ पंडीत (वय ५२, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांना संशयिताने अपोलो स्पोन्सर्ड जॉइन अवर फ्री व्हॉटस् स्टडी ग्रुप ऑफ शेअर मार्केटींग अशा पाहिलेल्या जाहिरातीमधून शेअर मार्केटमधील अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट या प्रसिद्ध कंपनीचे नावाने गुंतवणूकीचे व त्यावर नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. सल्लागार सांची अरोरा यांनी तयार केलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर फिर्यादी पंडीत यांना जॉईन करुन घेऊन प्रोफेसर जॉनहॅशमॅन यांच्या आवाजातील ऑडिओद्वारे वापर करुन चांगला परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. संशयिताने पंडीत यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी ८ लाख रुपयांची बॅक खात्यातून रक्कम स्विकारली. त्या रक्कमेतील २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम परत केली. मात्र उर्वरित गुंतवणूक केलेली ५ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अभय पंडित यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.