
रेल्वे मालगाडीने धडक दिल्याने अज्ञाताचा मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील आंबेड खुर्द येथे रेल्वे रुळादरम्यान अनोळखी इसमाला मालगाडीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बाबतची खबर संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे पाँईटमन म्हणून काम पाहणाऱ्या दिनेश कृष्णा कांबळे यांनी दिली आहे.
अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने ओळख पटलेली नाही. हा मृतदेह ९ जुलै २०२४ रोजी रात्री ८.१७ वाजण्यापूर्वी संगमेश्वर ते आंबेड खुर्द येथील बोगद्यामध्ये सापडला आहे. रत्नागिरीकडून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीवरील गार्ड संजय कांबळे यांनी या बाबतची खबर तत्काळ दिली. आंबेड खुर्दे येथील रेल्वे बोगद्यामध्ये जावून पाहिले असता एक पुरुष जातीचा मृतदेह पडलेला असून त्याचे शरीर रेल्वेच्या धडकेत छिन्नविछिन्न होवून तुकडे झालेले होते. त्याच्या अंगावर निळसर रंगाचा चेक्सचा शर्ट फाटून तुकडे पडलेले व काळपट रंगाची जिन्स पॅन्ट फाटलेली होती. या बाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.