
खेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन महिला जखमी
खेड : शहरातील महाडनाका येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोघी जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर चालकाने तातडीने घटनास्थळावरून पलायन केले. अज्ञात चालकावर मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायली संतोष दळवी (२३ रा. नांदगाव-दळवीवाडी), संस्कृती संदीप चव्हाण (रा. संतसेना नगर-शिवतररोड) अशी जखमींची नावे आहेत. संस्कृती चव्हाण दुचाकीने (एम.एच. ०८ ए.एफ. ४५१३) इंडिकेटर देवून रस्ता ओलांडत होत्या. याचवेळी भरणे येथून खेडच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करतं दुचाकीला धडक दिली. यात दोघीही जखमी झाल्या. अज्ञात वाहनचालकाने खबर न देता घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानुसार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.