
रत्नागिरीत अमली पदार्थ विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : रात्रीच्या गस्तीदरम्यान
विक्रीसाठी आणलेले ब्राऊन हेरॉइन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, हा अमली पदार्थ ५ ग्रॅम वजनाचा असून, त्याची किंमत १६,८०० रुपये इतकी आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी शहरातील नाईक हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी सोहेब शकील सोलकर, आकीब काझी, फैसल महसूद (सर्व रा. रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांपैकी सोहेब सोलकर व आकीब काझी यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार प्रशांत प्रभाकर बोरकर यांनी फिर्याद दिली आहे.
रत्नागिरी शहर पोलिस स्थानकातील कर्मचारी गुरुवारी सायंकाळी शहरात गस्त घालत असताना नाईक हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सोहेब सोलकर हा उभा दिसला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉइन सापडले. त्याच्याकडे चौकशी केली असता विक्रीसाठी ब्राऊन हेरॉइन आणल्याचे स्पष्ट झाले. हा अमली पदार्थ त्याने आकीब काझी याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्याच बरोबर या गुन्ह्याशी फैसल मकसूद याचा संबंध असल्याचे पुढे आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी १६,८०० रुपयांच्या ब्राऊन हेरॉइनसह ५ हजारांचा मोबाइल आणि ५,८०० रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.