
वाढलेल्या विद्युत दाबामुळे उपकरणांचे लाखोंचे नुकसान
लांजा:- अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे खेरवसे जाधववाडी येथील अनेक ग्रामस्थांच्या घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज यांसारखी विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही ठिकाणी सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत. लांजा शहरातही हा प्रकार सुरू आहे. अशातच खेरवसे जाधववाडी येथे गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अचानकपणे वाढलेल्या विद्युत दाबामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे, ट्यूबलाईट आदी विद्युत उपकरणे जळून गेलीत तर काही घरातील वीज उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
विद्युत उपकरणे जळून नुकसान झालेल्यांमध्ये प्रवीण जाधव, विजय जाधव, सदानंद जाधव, मनोहर सावंत, राजू सावंत, रामचंद्र मेस्त्री, मंगला लोटणकर, राजेंद्र मेस्त्री, सुरेंद्र ब्रीद, रामदास सावंत, परशुराम जाधव, संतोष लोटणकर, रवींद्र लोटणकर यांसह अनेक ग्रामस्थांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या उपकरणाबाबत पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खेरवसे जाधववाडीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.