
दाभोळे घाटात दरड कोसळली; वाहतूक अडीच तास ठप्प
देवरुख : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे घाटात शनिवारी दुपारी दुपारी ३.१५ च्या सुमारास दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ५.३० च्या सुमारास दरड बाजूला केल्यानंतर महामार्गाच्या वाहतूक सुरळीत झाली आहे.
मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात पुरेशी काळजी न घेतल्याने दाभोळे घाटात शनिवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र प्रसंगावधान जाणून महामार्गावरील कामगारांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूला सुमारे १ किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे पोलीस कर्मचारी, दाभोळे महामार्ग मृत्यूंजय दूध ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, काका हिरवे आणि रवींद्र सुकम यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वाहतुकीचे नियमन केले. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आल्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान महामार्गावर चिखलमिश्रित पाणी जोरदार वाहत असल्याने दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय येत होता.