
निवळी येथे डंपरची रिक्षाला धडक; चौघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील रांभोळकरीन देवी रस्त्यावर डंपरने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात. चालकासह चार विद्यार्थी व एक चार वर्षाची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर गंभीर जखमी लहान मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी दीडच्या सुमारास निवळी-रांभोळकरीन देवी रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक उमेश शंकर धनावडे (वय ३४, रा. करबुडे, ता. रत्नागिरी) हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ६५२०) मध्ये श्री महालक्ष्मी विद्यालय-खेडशी येथील अकरावी-बारावीच्या विद्यार्थीनींना घेऊन खेडशीहून करबुडे येथे जात होता. खेडशीहून निवळी रांभोळकरीन देवी रस्त्यावर आले असताना निवळीहून रत्नागिरीकडे येणाऱ्या डंपर (क्र. एमएच-४६ बीयू ५१६०) वरिल चालकाने समोरुन रिक्षा जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला तर डंपर उलटला. या अपघातात विद्यार्थीनी श्वेता सुरेश धनावडे १७, शर्वरी रमेश धनावडे १६, जागृती श्रीपत धनावडे १७, लहान चार वर्षाची मुलगी साईशा चरण धनावडे (सर्व रा. करबुडे) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी लहान मुलगी साईशा हिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
भर दुपारी घडलेल्या अपघातात डंपर चालकाने रिक्षाला ठोकर दिल्यानंतर रस्त्यावरच उलटला. या अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला. रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच डंपर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेची खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.