
चिपळुणातील विकृत तरुणावर पोस्कोंतर्गत गुन्हा
चिपळूण : तरुणी समोर येताच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या विकृत तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. त्या तरुणावर चिपळूण पोलिसात पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
या तरुणाने काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयातील विद्यार्थिनी समोर येताच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते.’ यावेळी विकृताचा चेहरा स्पष्टपणे दिसला नव्हता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. हा विकृत तरुण कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महाविद्यालय परिसरासह शहरातील सार्वजनिक ठिकाणी वॉच ठेवला होता. अशातच शनिवारी दुपारी या विकृत तरुणाने एका तरुणीसमोर असाच प्रकार केला. या तरुणीने याची माहिती नागरिकांना दिल्यानुसार त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.