
आजपासून कोरे मार्गावर एक महिन्याचा मेगाब्लॉक
खेड : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पायाभूत कामासाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे 30 जूनपासून पुढील एक महिना मध्य आणि कोकण रेल्वेमार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरूनच सुटेल. त्यामुळे मुंबई महानगरात राहणार्या कोकणवासीय प्रवाशांसह इतर प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होणार आहे. गेल्या काही कालावधीपासून कोकण रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही रेल्वेगाड्या सुमारे 10 तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक विघडत आहे. अनेकवेळा रत्नागिरी विविध कामानिमित्त प्रवास करत असतात. त्यांची गैरसोय होत आहे.
नुकताच सीएसएमटी येथील 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम कोकणात येणार्या अनेक रेल्वेगाड्यांवर झाला. आता एलटीटीच्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल दुरुस्ती करणार्या मर्यादित मार्गिकचे (पिट लाइन) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक घेऊन नेत्रावती आणि मत्स्यगंधा या एक्स्प्रेस अंशतः रद्द करून थांबा बदलण्यात आला आहे. तिरुवअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दररोज नेत्रावती एक्स्प्रेस 30 जून ते 30 जुलै या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकातच आपला प्रवास संपवणार आहे तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवअनंतपुरमदरम्यान दररोज धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस 1 ते 30 जुलै अशी संपूर्ण महिनाभर पनवेल येथूनच आपल्या प्रवास सुरू करेल. मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस 1 ते 30 जुलै या कालावधीत पनवेल येथूनच मंगळूर सेंट्रलला जाण्यासाठी निघणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.