
खवले मांजर तस्करी प्रकरणातील संशयित अद्यापही फरार
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोरील खवले मांजर तस्करी प्रकरणात सहभाग असलेला संशयित गुजरात येथून पुन्हा अन्यत्र फरारी झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या पथकाकडून संशयिताचा शोध जारी असून येत्या ४-५ दिवसात त्याच्या मुसक्या आवळण्यात यश येईल, असा विश्वास दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.
खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिष अशोक सोनावणे (तुळशी बुद्रुक बौद्धवाडी), अनिल धोंडूराम जाधव (नागाव-महाड), राजेंद्र रघुनाथ मोरे (दिवीळ-पोलादपूर) या तिघांच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या होत्या. या तस्करी प्रकरणाचे रॅकेट मुंबईपर्यंत असल्याचे तपासात उघड झाले होते. यामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर वनविभागाचे पथक त्याच्या मागावर होते. हा संशयित गुजरात येथे फरारी झाला होता.
गेल्या ४ महिन्यांपासून वनविभागाच्या पथकाला गुंगारा देणाऱ्या संशयिताचा ठावठिकाणा वनविभागाला लागलेला असतानाच त्याने पुन्हा अन्यत्र पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या पथकाकडून फरारी संशयिताचा शोध जारी असून ४-५ दिवसातच त्याला जेरबंद करण्याची फिल्डींग लावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गशर्दनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व सहकारी करत आहेत.