
लोटे अपघातातील वृद्धाचा मृत्यू, क्रेनचालकावर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील श्रेयस कंपनीसमोर असणाऱ्या एस. आर. फाटा वळणावर झालेल्या अपघातात वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हायड्रा क्रेनचालक पप्पूकुमार नगिना यादव (१९, सध्या रा. घाणेखुंट, मूळगाव बिहार) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात रामचंद्र विठ्ठल जाधव (६७, रा. असगणी-समर्थनगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ते सायकलने किराणा मालाचे सामान आणण्यासाठी लोटे येथील खेडेकर यांच्या किराणा दुकानात गेले असता पुन्हा असगणी येथे सायकलने जात असताना हायड्रा क्रेनने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.