
दापोलीतील चोरीत सीसीटीव्ही कॅमेरेही लंपास
दापोली:- दापोली शहरातील मच्छीमार्केट परिसरात असणारे शुभम ज्वेलर्स ही सोन्याची पेढी फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह १० हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआरसुद्धा चोरट्यांनी लंपास केल्याचे तपासात पुढे आले आहे. यामुळे तपासकार्य करताना ही बाब अडचणीची ठरणार आहे.
दापोली मच्छीमार्केट येथील सोन्याचे दुकान अज्ञाताने फोडून दुकानांमधून सुमारे ३ लाख रु. किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. यात कुडी, टॉप्स, लहान-मोठ्या आकाराच्या सुमारे ८० ग्रॅम वजनाच्या ४० जोड्या चोरट्याने लांबवल्या. तसेच २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरले. यात पैंजण, मूर्ती, ब्रेसलेट, जोडवी, कडे, छल्ले, मेखले, गळ्यातील चेन, अंगठ्या, दिवे इत्यादी वस्तू होत्या. याचे वजन सुमारे ५ किलो असल्याचे पुढे आले आहे. याबाबत दापोली पोलिसात शुभम ज्वेलर्सचे मालक संजय वारणकर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत.