
चिपळुणात ओमिज किचनच्या व्यवस्थापकावर गुन्हा
चिपळूण:- शहरातील काविळतळी येथे ओमिज किचन हॉटेलमध्ये झालेल्या वादाप्रकरणी त्या कारचालकाने शनिवारी परस्परविरोधी फिर्यादी दिली असून त्यानुसार हॉटेलच्या व्यवस्थापकावरदेखील चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीसह कारचे नुकसान केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ओमिज किचनचे मॅनेजर (नाव गाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद आशीर्वाद विजय आयरे (खेर्डी) यांनी दिली आहे.
आयरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आशीर्वाद आयरे हे २२ रोजी रात्री रोजी रात्री ९.५४ वाजण्याच्या सुमारास जेवणाकरता ओमिज किचन या हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी जेवणासाठी ऑर्डर देऊन पिण्यासाठी पाणी मागितले असता वेटरने आयरे यांना बिस्लरी बॉटल आणून दिली. त्यावेळी आयरे यांनी बिस्लरी नको मला साधे पाणी द्या, माझ्याकडे बिस्लरी बॉटलचे देण्यासाठी तेवढे पैसे नाही, असे सांगतले.
त्यावर आमच्याकडे गढूळ पाणी असून तुम्हाला हेच पाणी प्यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. यातून आयरे व व्यवस्थापकामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यावेळी आयरे हे हॉटेलमधून बाहेर पडत असताना व्यवस्थापकाने त्यांना हाताने शिवीगाळ केली. तसेच आयरे यांनी बाहेर पार्क केलेल्या चारचाकी गाडीवर बाकडे मारुन बोनेट व कारचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.