
साखरपा येथे दोघांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा मृत्यू..
देवरुख
साखरपा जाधववाडी येथे दोघांवर हल्ला करून जखमी करणारा बिबट्या आज मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा गुरांच्या गोठ्यात शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान शुक्रवारी ज्या ठिकाणी तरुणावर हल्ला झाला होता, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर गोठ्यात बिबट्याचा मृत्यू झाला. तो जखमी असल्याने जास्त अंतर पार न केल्याने तेथेच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्या बिबट्याला देवरुख येथे नेवून शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.