
सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशनच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण राजरत्न जाधव (२७, रा. नाचणे रसाळवाडी, रत्नागिरी. मूळ – कर्ली ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन स्टॉपच्या मागील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मद्यप्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याच्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.