
मंगळवार आठवडा बाजारासोबत व्यापारी संकुल उभारावे मनसे ची मागणी
रत्नागिरी: शहरातील नाचणे रोड येथे दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो
या जागेत आता नागरिकांच्या सोयीसाठी व नगरपरिषदेला उत्पन्न प्राप्त होण्याच्या दृष्टीने भव्य व्यापारी संकुल उभारण्यात यावे अशी मागणी आज मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. मनसे तर्फे उपमुख्याधिकारी माने यांना दिलेल्या निवेदनात आठवडा बाजारच्या या जागेत दोन मजली इमारत उभारण्यात यावी यामध्ये तळमजल्यावर आतील बाजूस भाजीपाला व फळविक्रीसाठी स्वतंत्र विभाग आणि मांस व मत्स्यविक्रीसाठी स्वतंत्र विभाग तर बाहेरील बाजूस दुकान गाळे असावे व दुसऱ्या मजल्यावर बहुपयोगी भव्य सभागृह बांधण्यात यावे अशी मागणीवजा सूचना मनसेतर्फे करण्यात आली आहे. रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून यावर नगरपरिषद प्रशासनाने विचार करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसंघटक अमोल श्रीनाथ, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव,शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतीश खामकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.