घाणेकर अपघाती मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा
इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनी संचालक, अभियंता, चालकाचा समावेश
गुहागर: गुहागर तालुक्यातील असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर वाहनाने केबल ओढल्याने केबलचा फटका बसून यामध्ये सतेश किसन घाणेकर याचा मृत्यू झाला होता तर तिघेजण गंभीर जखमी झाले होते याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या संचालक व इंजिनिअर्ससह वाहन चालवणाऱ्या चालकावर मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना १८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली होती.
गुहागर तालुक्यातील असगोली येथील मृत सतेश किसन घाणेकर हे आपल्या लहान मुलासहित व आपल्या सहकाऱ्यासमवेत १८ एप्रिल २०२४ रोजी अक्टिवा गाडीने जात असताना असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर चार चाकी वाहनाने इंटरनेट केबल ओढत नेल्याने त्याचा फटका बसून दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये सतेश घाणेकर यांचा १९ एप्रिल २०२४ रोजी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये श्रीवांश सतेश घाणेकर, पांडुरंग सहदेव घर्वे त्याचबरोबर पाठीमागून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सौ. स्नेहल सुभाष रायकर असे तिघेजण जखमी झाले होते.
प्रकरणी घाणेकर यांच्या पत्नीने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेचा तपास उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांच्याकडे होता. या तपासामध्ये अखेर १७ जून २०२४ रोजी दुपारी २. १८ वाजता पीपीएम इलेक्ट्रिकल अँड सोलर सर्विस या बीड स्थित कंपनीचे संचालक व इंजिनियर्स त्याचबरोबर वाहन चालक पारस विलास पवार, चिखली सोलकरवाडी तालुका गुहागर यांच्यावर भा. दं.वि.सं. कलम ३०४ (अ), ३३७, ३४ प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, पीपीएम इलेक्ट्रिकल अँड सोलर सर्विस या कंपनीने गुहागर हद्दीमध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असलेली फायबर वायर ही योग्य रीतीने न टाकता निष्काळजीपणे टाकली. कालांतराने असगोली येथे रोडच्या कडेला इलेक्ट्रिक तसेच कंपनीच्या पोलचा आधार घेऊन टाकण्यात आलेली फायबर केबल वायर खाली लोंकळत येऊन त्या फायबर केबल वायरला झोला पडला.
तसेच त्या तारखेस वेळेत त्याजागी ट्रक चालकाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक निष्काळजीपणाने असगोली गुहागर या रस्त्यावर चालवत नेत होता. रस्त्यालगत लोंबकळणारी व दोन पोलला बांधण्यात आलेली फायबर केबलही त्या ट्रकला अडकून ती फायबर वायर तुटून त्या फायबर वायरचा फटका बसून घाणेकरचा मृत्यू झाला.