
खवले मांजर तस्करीतील संशयित गुजरातला फरारी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोर खवले मांजर तस्करी प्रकरणाचे रॅकेट ४ महिन्यापूर्वी वनविभागाच्या पथकाने उघडकीस आणले होते. या खवले मांजर तस्करीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड होवून आणखी एकाचा सहभाग असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. मात्र यातील सहभागी संशयित गुजरातला फरारी झाला होता. या संशयिताचा सुगावा वनविभागाच्या पथकाला लागल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने फिल्डींगही लावल्याचे समजते.
खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिष अशोक सोनावणे (तुळशी बुद्रुक बौद्धवाडी), अनिल धोंडीराम जाधव (नागाव-मडाड), राजेंद्र रघुनाथ मोरे (दिबीळ-पोलादपूर) या तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले होते. खवले मांजर तस्करी प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे यांच्यासह पथकातील अन्य सहकाऱ्यांनी कंबर कसली होती.
या तस्करी प्रकरणाचे रॅकेट मुंबईपर्यंत असल्याचेही तपासात उघड झाले होते. याशिवाय खवले मांजर तस्करी प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर वनविभागाचे पथक त्याच्या मागाबर होते. मात्र हा संशयित गुजरातला फरारी झाला होता. गेल्या ४ महिन्यांपासून वनविभागाच्या पथकाला गुंगारा देणाऱ्या या संशयिताचा ठावठिकाणा पथकाला लागल्याचे विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. हा संशयित एका ठिकाणी येणार असून त्या ठिकाणी त्याला गजाआड करण्यासाठी पथकाने सापळा रचल्याचे समजते. या संशयिताच्या अटकेनंतर खवले मांजर तस्करीच्या नेमक्या कनेक्शनचा उलगडा होणार असून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व खेडचे वनपाल सुरेश उपरे व सहकारी करत आहेत.