
काटवली गावमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील काटवली केदारलिंग गावमंदिरातीत दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.
पुरावा राहू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीची स्टोरेज सिस्टिीमही गायब केली आहे. केदारलिंग गावमंदिर ८ रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. ९ रोजी पुजारी सकाळी १० वाजता पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात गेले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आते. ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली. देवरूख पोलीस ठाण्यात या घटनेची खबर देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. याप्रसंगी पोलीस पाटील संदीप घवाळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर गुरव, महेंद्र नांदळजकर, नथुराम मैत्री, रविंद्र गुरव, निलेश गुरव, प्रकाश गुरव, संजय धाग, बाळकृष्ण उबारे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. ही बाब चोरट्यांच्या निदर्शनास आल्याने मुख्य गाभाऱ्याचे कुलुप तोडून सीसीटीव्हीची स्टोरेज सिस्टिमही गायब केली आहे.