
चार नवनगरांचे नकाशे बनवण्याचे काम पूर्ण
रत्नागिरी: कोकण द्रुतगती आणि समुद्रकिनारा महामार्गालगतच्या क्षेत्र विकासासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना विभागाकडून जिल्ह्यातील देवके, दोडावण, नवीन गणपतीपुळे, आंबोळगड यो चार ठिकाणी नवनगरे अधिसूचित करण्यात आल्यानंतर या नवनगरांचे नकाशे बनवण्याचे काम पूर्ण झाले आहेत. हे नकाशे रत्नागिरीतून वरिष्ठ कार्यालयाला मान्यतेसाठी सादर झाले आहेत.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील ७२२ गावांपैकी १०५ महसुली गावातील क्षेत्र नवनगरांसाठी निश्चित करण्यात आले आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यातून जाणारा कोकण द्रुतगती महामार्ग तसेच कोकण किनारपट्टी महामार्गालगत एकूण १३ नवनगरे स्थापन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे.
जिल्ह्यात राजापूरमधील १३ गावांचे आंबोळगड हे नवनगर, दापोलीतील ७ गावांचे मिळून देवके हे नवनगर, गुहागरमधील दोडावण या नवनगरासाठी ६ गावे तर नवीन गणपतीपुळे या नवनगरासाठी ७ गावे निवडण्यात आली आहेत. या नवीन नगरांचा विकास आराखडा तयार होईपर्यंत या गावातील बांधकाम व विकास प्रक्रियेची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच राहणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.
अधिसूचना जारी झाल्यानंतर नवनगरांचे नकाशे नगररचना विभागाने तयार केले आहेत. हे नकाशे मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आले आहेत. वरिष्ठ कार्यालय या नकाशांना मान्यता देऊन नगर नियोजनासाठी नव्या परवानग्यांसाठी या नकाशांचा उपयोग करणार आहेत.
नगररचना विभागाच्या कायद्याचा अंमलही नकाशामध्ये दाखवण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये होणार आहे. तेथील विकास नियमावली ग्रामीण क्षेत्रातील निकषांऐवजी नगर क्षेत्रातील निकषांवर आधारित असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवानगरांमध्ये समाविष्ठ असलेल्या गावांची यादी
नवीन गणपतीपुळे: नेवरे, भगवतीनगर, गणपतीपुळे, धामणसे, भंडारपुळे, निवेंडी, ओरी, तळेकरवाडी.
दोडावणः मुसलोंडी, नववण, चिंद्रावले, वाघांबे, दोडवली.
देवकेः किन्हाळ, देवके, चंडीकानगर, बुरोंडी, तेलेश्वरनगर, शितलनगर, महामयनगर.
आंबोळगडः भराडीन, वाडातिवरे, पनेरे, नाटे, आंबोळगड, धाऊलवल्ली, भाबळेवाडी, पोकळेवाडी, राजवाडी, दसुरेवाडी, साखरीनाटे, यशवंतगड, बंधावाडी.