
दापोलीतून ८०० टन आंबा कॅनिंगसाठी
दापोली : दापोली तालुक्यामधून ७०० ते ८०० टन आंबा कॅनिंगसाठी गेला असल्याची माहिती आंबा व्यावसायिकांनी दिली. यावर्षी आंबा कमी प्रमाणात आला तसेच कर्नाटकी आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात आहे.
त्याचबरोबर फळगळ, रोग, वादळी वारे, पाऊस, माकडांचा त्रास यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. कर्नाटकी आंबा कमी दरात देवगड हापूस, रत्नागिरी या नावाने विकल्याने बागायतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यावर्षी वातावरणातील बदलामुळे आंबा उशिराने आला. त्यामुळे वाशी बाजारसमितीत जाणारा आंबापेटीचा मुहूर्तही हुकला. योग्य दर मिळत नसल्याचे मत आंबा बागायतदारांनी व्यक्त केले. त्यामुळे आंबा कॅनिंगसाठी दापोलीतून पाठविण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अनेक शेतकऱ्यांनी किलोवर आंबा विकला. यावर्षी तालुक्यातून ७०० टन आंबा व कॅनिंगसाठी पाठवण्यात आला.