
भरणे येथे चोरट्याला रंगेहात पकडले
खेड : खेड-भरणे मार्गावरील आठवडा बाजारात दुकानात खरेदीचे पैसे देताना भंगार गोळा करणाऱ्याने २० हजार रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरी करीत असताना फिर्यादी यांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हिरासिंग राठोड असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) घडली. संयाजी बापू गायकवाड हे बाजार खरेदी करत असताना त्यांच्या बॅगेत २० हजार एवढी रक्कम होती. गर्दीचा फायदा घेत संशयित ती रक्कम बॅगेतून काढून स्वतःच्या पिशवीत भरत असताना पैशाचा बंडल खाली पडला त्यावेळी त्याला पकडले.