रत्नागिरी शहरातील दोन ठिकाणी मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ एका बंद टपरीच्या आडोशाला व परकार मस्जिदच्या मागील बाजूस विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुबेर कुतबुद्दीन मुजावर व केतन मधुकर गुरव अशी संशयितांचे नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बसस्थानक येथे ८५७ रुपये तर परकार मस्जिद येथे १ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भालचंद्र मयेकर व अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.