बंद गाडीत ठेवलेल्या श्र्वानाचा गुदमरून मृत्यू; चालका विरोधात गुन्हा
रत्नागिरी :पार्क केलेल्या गाडीत काचा बंद करुन, श्वानाला श्वासोश्वस घेता येईल याची काळजी न केल्याने मॉग्नेल मादी जातीचे श्वानाचा मृत्यू झाला. प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत सुभाष माळी (वय ३६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास वरदविनायक पे. अॅण्ड पार्क गणपतीपुळे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने मोटार (क्र. एमएच-१५ इपी ८११९) हे वाहन गणपतीपुळे येथे पे अॅण्ड पार्क येथे पार्क करुन त्यामध्ये एक सफेद रंगाचे, आठ महिन्याचे मॉनोल मादी जातीचे श्वान वाहनाच्या काचा बंद करुन आत मध्ये ठेवले. त्याला श्वासोश्वस घेता येईल की, नाही याची काळजी न केल्यामुळे श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ऋषीराज जोशी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.