
धनादेश न वठल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता
रत्नागिरी :येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात योगेंद्र श्रीपाद ढोले यांनी धनादेश अनाधारित झाल्या प्रकरणी अनिल गोविंद ढोले यांचे विरुद्ध 2016 साली खटला दाखल केला होता.
या खटल्यामध्ये गुणदोषावर सुनावणी होऊन, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. पवार यांनी आरोपी अनिल गोविंद ढोले याला परक्राम्य दस्तऐवज अधिनियम चे कलम 138 प्रमाणे दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास आणि 2,74,750/- रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश केले होते. तसेच सदर नुकसान भरपाई रक्कम न दिल्यास आणखी एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती.
या खटल्याचा निकाल 22/04/2022 रोजी झाला होता. मात्र आरोपी अनिल गोविंद ढोले यांनी सत्र न्यायालयात अपील करून शिक्षेला स्थगिती मिळवली होती. सदर अपील कामी आरोपी-अपिलार्थी अनिल ढोले यांनी 2,84,000 एवढी रक्कम फिर्यादी योगेंद्र ढोले यांना देण्याचे मान्य केले व त्याप्रमाणे रक्कम अदा केली. त्यामुळे सदर अपिलाचे कामी लोक अदालतमध्ये फिर्यादी योगेंद्र ढोले यांनी तडजोड करून आरोपी नात्यातील असलेने, आरोपीला शिक्षेची मागणी मागे घेतली. त्यामूळे या प्रकरणात आरोपीची शिक्षेशीवाय मुक्तता करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश एक श्री आंबळकर यांचे अध्यक्षतेखालील पॅनल समोर सदर यशस्वी तडजोड घडवून आणली गेली. लोकअदालत च्या माध्यमातून दोन्ही पक्षांना न्याय मिळाल्यामुळे दोन्ही पक्षकार समाधानी आहेत.