
लाकडी दांड्याने बैलाला मारहाण; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील महावितरण कार्यालय परिसरात लाकडी दांड्याने बैलाला मारहाण केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक विष्णू जोशी (रा. टिळकआळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० नोव्हेंबरला रात्री ८ च्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला महावितरण कार्यालय झाडगांव येथे विवेक जोशी हा बैलाला लाकडी दांडक्याने मारहाण करत होता. यावेळी संध्या अनिल कोसुंबकर (रा. रत्नागिरी) यांनी जोशी यांना अडविण्याचा प्रयत्न केला तसेच बैलाला मारण्याचे कारण देखील विचारले. विवेक याने ही मोकाट गुरे आहेत. परत जर ती या ठिकाणी आली तर आपण त्यांना मारणारच तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तर दिले. बैलाला दुखापत झाल्याने कोसुंबकर यांनी बैलाला गोशाळेतपाठविले. तसेच विवेक यांच्याविरुद्ध बैलाला दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ४२९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.