
दापोलीत बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या १० नौकांवर कारवाई
दापोली:जानेवारीपासून दापोली तालुक्यातील समुद्रामध्ये एलईडी, पर्ससिनेट तसेच बंदीच्या कालावधीत मासेमारी करणाऱ्या १० नौकांवर परवाना अधिकारी व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाकडून कारवाई केली आहे. या सर्वांना ५ लाख २७ हजारांचा दंड केला आहे.
परराज्यातील नौकांमुळे स्थानिक मासेमारीला घरघर लागली आहे; मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने उपाययोजना करत नसल्याची खंत अनेकदा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांमुळे अधिक मासे जमा होत असल्याने काही तासातच लाखोंची मासळी हे एलईडी नौकावाले घेऊन जातात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासे मिळवताना तारेवरची कसरत करावी लागते.
महिनाभरापूर्वी परराज्यातील नौका हर्णे समुद्रात मासेमारी करत होत्या. यामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना मासे मिळणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळेदेखील अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मासेमारीला प्रारंभ झाल्यापासून अनेकवेळा पाऊस, वारा यामुळे बोटी खाडीत उभ्या कराव्या लागतात.