
ई-लर्निंगबाबत माहिती देऊन तरुणाला १५ हजारांला घातला गंडा
रत्नागिरी :ई-लर्निंगबाबत माहिती देऊन वस्तू खरेदी करण्यास सांगून ती सुरू न करता अधिक पैशाची मागणी करत रत्नागिरीतील तरुणाला १५ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीप्रकरणी विजय अशोक पाटील (३५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी, मूळ रा. मु. पो. मुदाळ, ता. भुदरगड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. विजय पाटील हे नोकरी करत असून, त्यांना ६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ७३०४३१४२०४ या क्रमांकावरून ओंकार भोसले (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) याने फोन केला. त्याने विजय पाटील यांना ई- लर्निंगबाबत माहिती देऊन विश्वास संपादन केला.
त्यानंतर सवलतीत नवी मुंबईतील लर्निंग स्टर कंपनीची वस्तू विकत घेण्यास सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून १५ हजार रुपये घेण्यात आले. ही वस्तू विजय पाटील यांना स्पीड पोस्टाने पाठवून देण्यात आली. मात्र, ही वस्तू त्यांना सुरू करून देण्यात आली नाही. ही वस्तू सुरू न करताच विजय पाटील यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस तपास करीत आहेत.