
सावंतवाडी पॅसेंजरला जोडणार विद्युत इंजिन
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस शनिवारपासून (ता. २) डिझेल इंजिनऐवजी विद्युत इंजिनवर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या डिझेल इंजिनऐवजी विद्युत इंजिनवर चालवण्यात येत आहेत.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिवा ते सावंतवाडी एक्स्प्रेस तसेच पुढे सावंतवाडी ते मडगाव अशी चालवली जाणारी पॅसेंजर २ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे. या मार्गावर धावताना परतीच्या प्रवासात ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनवर चालवली जाणार आहे.