
बसखाली भरधाव मोटार घुसल्याने अपघात
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलच्या पुढील बाजूस वळणाऱ्या चिपळूण-टेरव बसखाली भरधाव मोटार घुसल्याने मोटारीतील एकजण जखमी झाला. मात्र दोन्ही चालकांनी संयम दाखविल्याने अनर्थ टळला. हा अपघात बुधवारी ( ता.२९) सकाळी १०.४५ वाजता झाला.
चिपळूण आगारातून चिपळूण -टेरव ही एसटी (एमएच-२०-बीएल-१७६७) बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुटली. कामथे येथून वळून ही बस टेरवला जात असतान बस डिव्हायडर ओलांडताना लाडघर- दापोलीहून डेरवण हॉस्पिटलमध्ये एका हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना मोटार (एमएच-०२-सीएल-९४१४) बसच्या मागील चाकाजवळ घुसली. सुदैवाने बस सावकाश असल्याने अनर्थ टळला. मात्र चालकाच्या बाजूला बसलेल्या एकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला त्या रुग्णासह डेरवण येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. ही बस उमेश वाजे चालवित होते, तर मोटार सलील कर्देकर हा तरुण चालवित होता. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. याच दरम्याने एसटीचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के व त्यांचे सहकारी घटनास्थळी आहे. एसटीचे अधिकारी व मोटार चालक यांच्याशी चर्चा केली. मात्र मोटारचालकाने व इतर कोणीही तक्रार न दिल्याने या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही.