
मुख्यमंत्री दौऱ्यामुळे रत्नागिरीतील वाहतुकीत आज तात्पुरता बदल
रत्नागिरी :आज गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन समारंभाकरिता उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभाकरिता महाराष्ट्र राज्याचे अन्य मा. मंत्री महोदय देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दौरा कार्यक्रमादरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता रत्नागिरी शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये अंशतः बदल करण्यात आलेले आहेत.
आज गुरुवारी सायंकाळी ४ वा. पर्यंत, चर्मालय, रत्नागिरी ते चिंतामणी रुग्णालय, हा रोड अवजड माल वाहतुकी साठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. तसेच याच कालावधीत मारुती मंदिर – चर्मालय उद्यम नगर मेडिकल कॉलेज हा रोड अवजड माल वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे मान्यवर, पत्रकार, लाभार्थी व नागरिकांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था चंपक मैदान येथे करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय येथील मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी प्रवेश हा चंपक मैदानाच्या बाजूने (मिऱ्या बंदर नागपूर राष्ट्रीय महामार्ग) देण्यात आला आहे. तरी रत्नागिरी शहरातील सर्व अवजड वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.