
जि.प. बांधकामच्या अधिकाऱ्यांना
घेराव घालण्याचा संतोष पोकडे यांचा इशारा
रत्नागिरी:- पावस- डोर्ले-हर्चे मार्गावर रस्त्यालगत घनदाट झाडी वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोरुन येणारी वाहने दिसत नसल्याने वाहन चालकांना धोकादायक स्थितीत वाहने चालवावी लागत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वाढलेली झाली तत्काळ न तोडल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे.
रत्नागिरी-लांजा तालुक्यांना जोडणाऱ्या पावस- डोर्ले-हर्चे मार्गावर दोन्ही बाजूला प्रचंड झाडी वाढली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिल्यानंतर त्याची दखल अद्यापही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. वाढलेल्या झाडीमुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्याची अवस्थाही अंत्यत बिकट आहे. याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
जिल्हा परीषद बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन देवून सुद्दा दखल घेतली जात नाही. या सर्व बाबींचा निषेध करुन कोणतीहि पुर्व सुचना न देता सबंधित विभागाला घेराव घालण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे.