
दापोली मतदार संघात शिंदे गट आणि भाजपात जुंपली
रत्नागिरी:- जिल्ह्यातल्या दापोली-खेड विधानसभा मतदारसंघात गेल्या सव्वा वर्षांपासून युती असताना देखील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना भाजपचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा देखील विसर पडलाय, असा आरोप भाजपाचे खेड तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. तर भाजपच्या तालुकाध्यक्षांचे सर्व आरोप शिवसेना शिंदे गटाचे खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी फेटाळून लावले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष नेमकं भाजपचेच काम करतात का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे खेड-दापोली विधानसभा मतदार संघात आता युती असताना देखील भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट सामना रंगत चालला आहे.
आमदार योगेश कदमांना पंतप्रधानांचा विसर : भाजप
संपूर्ण राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप राष्ट्रवादी यांची महायुती आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली- खेड विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये विकासकामांच्या उद्धघाटनावरून चांगलाच वाद सुरु झाला आहे. भाजपच्या आमदारांनी या मतदार संघात मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे विद्यमान आमदार योगेश कदम हे भूमिपूजन करत आहेत. भाजपच्या कामांचे श्रेय आमदार योगेश कदम घेत असून स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कसलीही कल्पना दिली जात नाही, एवढेच नाही तर जलजीवन मिशन तसेच केंद्र सरकारच्या इतर मंजूर योजनांचे देखील ते भूमिपूजन करत असून त्याठिकाणी देशाच्या पंतप्रधानांचा साधा फोटो अथवा उल्लेख देखील केला जात नाही. याबाबत आपण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपाचे खेड तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे यांनी आज खेडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट सध्या युतीत असून खेड दापोली विधानसभा मतदार संघात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे.
विकासकामांच्या भूमिपूजनावरून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या सर्व आरोपांना शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन धाडवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे, भाजपचे तालुकाध्यक्ष नेमके कोणाचे तालुकाध्यक्ष आहेत, मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उबाठा गटाचे त्यांनी काम केले होते, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक विकासकामांच्या कार्यक्रमांना आपण स्वतः निमंत्रण देतो, दापोलीमध्ये देखील भाजपचे पदाधिकारी परस्पर उद्धघाटणे व भूमिपूजन करतात, बोलण्यासारखं भरपूर आहे, असे बोलून भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आरोप त्यांनी खोडून काढले आहेत.
आता दापोली-खेड विधानसभा मतदार संघात महायुतीमध्येच विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्धघाटनावरून निर्माण झालेला वाद पक्षश्रेष्टींकडे गेला आहे. पुढील काळात या वादावर तोडगा निघाला नाही तर भाजप पुढची भूमिका जाहीर करेल असा इशारा देखील दिला गेला आहे.