
स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना सन्मानित करणार : ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :सहकार सप्ताहाचे निमित्ताने सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान पुरस्कार देऊन स्वरूपानंद सहकारी पतसंस्था गौरवणार आहे. सन्मान चिन्ह व रुपये ३०००/- असे सन्मानाचे स्वरूप असेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ, गृहनिर्माण चळवळ उत्तम पद्धतीने मार्गस्थ आहे. ही उत्तम मार्गक्रमणा शक्य व्हावी म्हणून अनेक जण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. खरे तर प्रत्येक संस्थेतअशी सन्मानपूर्ती व्यक्तिमत्व आहेत. या व्यक्तीमत्वातून निवड करत प्रातिनिधिक स्वरूपाचा हा सन्मान सोहळा सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक प्रधान कार्यालयाच्या सहभागृहात होणार आहे.
या सन्मान सोहळ्याबरोबर सहकार सप्ताहाचा समारोप करताना सहकार संवाद कार्यक्रम त्याचवेळी आयोजित केला आहे. या दोन्हीही कार्यक्रमास जिल्ह्यातील सहकारी संस्था प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी केले आहे.
स्वरूप सन्मान वितरण आणि सहकार संवाद या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपानराव शिंदे तसेच सहकार क्षेत्रातील अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
आपल्या पैकीच काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या सन्मान कार्यक्रमास व सहकार संवाद कार्यक्रमास सहकार प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आग्रही आवाहन स्वामी स्वरूपानंद पतसंस्थे मार्फत करण्यात आले आहे.