
कोकण रेल्वे मार्गावर १७ ला मेगाब्लॉक
रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते सिंधुदुर्ग स्थानक दरम्यान १७ नोव्हेंबरला अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १७ ला सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मडगाव ते सावंतवाडी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी एक तास २० मिनिटे उशिराने सुटणार आहे. सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी सावंतवाडी रोड येथून २ तास पाच मिनिटे उशिराने सुटणार आहे. तसेच मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस करमाळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटे रोखून ठेवली जाईल, तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. मेगाब्लॉकचा परिणाम होणारी सहावी गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान थावणारी तेजस एक्सप्रेस ही आहे. १७ नोव्हेंबरला ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.