
घरफोडीत चोरीस गेलेले दागिने महिलेला मिळाले परत
चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथे घरफोडी करून चोरट्याने ७० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या चोरट्याला अटक करुन त्याच्याकडील दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, न्यायालयाच्या परवागीनंतर त्या महिलेस शुकवारी पोलिसांनी दागिने परत केले. चिपळूण पोलिसांमुळेच दागिने परत मिळाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
चित्रा वैभव वायाळ या रहात असलेल्या शहरातील शिवाजी नगरमधील घर फोडून चोरट्याने दीड तोळ्याचे ७० हजार रूपये किंमतीचे दागिने चोरुन नेले होते. या घटनेनंतर चित्रा वायाळ यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी चोरट्याने लांबवलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये दोन अंगठ्या व हाराचा समावेश होता. न्यायालयाच्या परवानगीनंतर शुक्रवारी चित्रा वायाळ यांना पोलिसांनी हे दागिने परत केले आहेत. आपल्याला दागिने परत मिळाल्यावर वायाळ यांनी समाधान व्यक्त करून पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.