
चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी आज रंगीत तालीम
रत्नागिरी:- चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी टेबलटॉप एक्झरसाइज अर्थात नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम आज, दि. ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोलीमधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या ५ गावांमध्ये रंगीत तालीम होणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने आज नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला मेरीटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, भारतीय तटरक्षक दलाचे जितेंद्र कुमार, मत्स्यविकास अधिकारी आनंद पालव, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीलेश माईनकर, इंडस्ट्रियल सेफ्टी ऍण्ड हेल्थचे उपसंचालक प्रदीप भायतोंडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डी. जी. सकपाळ आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील निवडलेल्या ५ गावांमध्ये गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने बैठकीत विशेष नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.