
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमार्फत तिसऱ्या नर्सिंग महाविद्यालयाचा शुभारंभ
रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमार्फत तिसऱ्या नर्सिंग महाविद्यालयाचा शुभारंभ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून 20 विद्यार्थिनींच्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी दि.28 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, श्रीमती संपदा जोशी यांनी केले आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला सन 2023-24 पासून एएनएम नर्सिंग या दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्सला शासनाच्या सुश्रुषा व परावैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र परिचर्या परिषदेची मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. स्वतंत्र वसतीगृह, प्रशस्त वर्गखोल्यांचे अत्याधुनिक प्रात्यक्षिक वर्ग तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नर्सिंग महाविद्यालयात 400 नर्सिंगच्या पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. बारावी परीक्षा उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थिनीला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. महाविद्यालयातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रात्यक्षिक अनुभवासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय, चिंतामणी हॉस्पीटल, चिरायु हॉस्पीटल तसेच शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संलग्नता करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी दि.28 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयाकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 7666504263, 9403214119 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंदार सावंतदेसाई, स्वप्नील सावंत, प्रसन्न दामले, प्राचार्या अर्चना बाईत, गौरी भंडारी यांनी केले आहे.